तू परतून येवू नकोस
तू नकळतपणे आलीस माझ्या
हृदयाच्या प्रांगणात चोरपावलानं
अन् समोरुन नाही तर एका
बेसावध क्षणी,तेही मागच्या दारानं
अजाणत्या वयात नाही कळालं
घ्यावा कुणाचा कौल?
बुद्धी नेहमीच सांगत आली
विचार कर खोल
पण हृदय घसरलं की
न कळे गेला मनाचा तोल
नंतर लक्षात आलं की तुला
नसे या कशाचंच मोल
अजुनही स्मरतोय मला
तुझा तो अलवार स्पर्श
अन् त्या मागोमागचं
निष्पाप, निरागस हास्य
कसं विसरू मी तुझं ते
मधुर निर्झर भाष्य
अन् नकळतपणे बाहेर
पडलेलं लाडीक “इश्श्य”
खरं सांगू??, तुझं हे प्रत्येक असणं
मी जपलंय वहीतल्या मोरपिसांसारखं
अगदी तुझं झिडकारणंही झेललंय मी
गुलाबाच्या काट्यासारखं
ते आठवण करुनं देतात मला
जखम अजूनही रक्तरंजीत असल्याचं
जरी तूला जाणवलं असेल
आताश्या, मला संवेदना असल्याचं
तू परतून येवू नकोस सोंग घेऊन
जसं काही झालंच नसल्याचं
खरंच, मला नाही झेपायचं दुःख
आणखी, हेही स्वप्न भंगल्याचं
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment