मन माझं बिलकूल थाऱ्यावर नसतं
आरशात पाहून माझं मलाच हसू येतं
कधी ते इतकं बहूरंगी की जणू
सप्तरंगी इंद्रधनुष्यही त्यापूढे फ़िकं असतं
कधी ते इतकं चंचल की जणू
फ़ुलांवर उडणारं फ़ुलपाखरू असतं
कधी ते इतकं खट्याळं की जणू
नवतरूणीचा सावरणारा पदर असतं
कधी ते इतकं बिलंदर चोर की जणू
केतकीच्या बनी नाचणारा मोर असतं
कधी ते इतकं अधीर की जणू
नवविवाहितेच्या वेणीतलं फ़ूल असतं
कधी ते इतकं हट्टी की जणू
गरोदर मुलीला हवसं चिंच अन बोर असतं
कधी ते इतकं कोमल की जणू
अती-स्निग्ध दुधावरची साय असतं
कधी ते इतकं लोभस की जणू
जमीनीवर रांगणारं गोंडस मुल असतं
कधी ते इतकं वेंधळं की जणू
जत्रेत हरवलेलं शेबडं पोर असतं
कधी ते इतकं अवजड की जणू
दुभत्या गायीच्या गळ्यातलं लोढणं असतं
कधी ते इतकं बधीर की जणू
ओल्या घावावरील लादीचा बर्फ़ं असतं
कधी ते इतकं कठोर की जणू
भल्या भल्यांचा कर्दनकाळ असतं
कधी ते इतकं आशयघन की जणू
अवजड संदर्भ ग्रंथातलं शेवटचं पान असतं
कधी ते इतकं विषण्ण होतं की जणू
गावच्या स्मशानभूमीतलं रिकामं बाकडं असतं
मलाच माहित नाही हे नक्की असं का असतं
तरीच आरशात पाहिलं की माझं मलाच हसू येतं
आजकाल सारखं असं का होतं? ———-
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment