मध्यरात्री दारावर टकटक
दार उघडलं
पडून-पडून जख्मी झालेला पाऊस
सरळ आत आला
'ती' कुठाय म्हणाला…
मी म्हटलं 'नाहीय'… 'ती नाहीय'
'म्हणजे?'
'म्हणजे ती आली नाही कधीच इथे'
'पण ती म्हणाली होती मला
इथेच भेटीन म्हणून… एनी वे! असं कर…
माझे ढग घे
वेशांतर कर
बरसून ये ती असेल तीथे… मी थकलोय…'
मग मी बाहेर पडलो
रात्रभर बरसबरस बरसलो कुठेकुठे
सकाळी घरी परतल्यावर पाऊस म्हणाला,
"जा ना साल्या जा…
माझ्याहून तूच चांगला बरसतोस…"
आता…
माझ्या खोलीत
ढगांशिवाय राहणारा 'तो'
आणि असा भणंग बरसत फिरणारा मी…
ओळखा पाहू…
खरा पाऊस कोण?
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment