असंच कधी काळी…

असंच कधी काळी जीवनाचा प्रवास करता करता
थांबलो एका मुग्ध वळणावर क्षणभर विश्रांती करता.

नकळत कानी पडली ती सुरेल संगीत सरीता
उडालेली धांदल तीची खट्याळ वाऱ्याशी झुंजता
पाहीलं तीला मी काहीसं अनावृत्त पदर सावरता
निसर्ग-निर्मात्याची अप्रतीम स्वर्गीय कलाकृती ती
कसं यावं ते आरस्पानी सौंदर्य शब्दात पकडता

नाहीच जाता आलं पूढे मला मग तिला डावलता
वाट संपली, प्रवास थांबला, मुक्काम विसरला,
तिथेच कडेला मी दिवास्वप्न महाल बांधला
श्रावणमासी हर्षमानसी हृदयी वसंत फ़ुलला
चोहीकडे उत्सवक्रिडा आसमंती प्रणय बहरला
नकळे, न रुचे काहींना तो आनंद सोहळा

नतद्रष्टांनी डाव साधला, एके रात्री धरण-बांधच फ़ोडला
स्वप्न-महाल विखुरला, अवघा आसंमत आक्रंदला
हा करुण सोहळा सर्वांनी मग काठावर बसुन पाहिला
जाता येता आजही पडतात शेवाळलेले भग्नावशेष दृष्टीला

माझं दिवास्वप्न आजकाल वापरलं जातंय स्मशानभूमीला
शकून म्हणून माझ्या संवेदनांचा दाहसंस्कार होता शुभारंभाला
कृतज्ञता म्हणून अमर केलंय नाव माझं देऊन प्रवेशद्वाराला
खरं तर,कायमचं जखडून टाकलंय भूता-खेतांच्या सानिध्याला

नाही म्हणायला टांगलेली असतात काही वटवाघळं सोबतीला
कधी काळी, चार लोकही येतात आप्तेष्ट म्हणून नक्राश्रू ढाळायला
मृत्यूला माझा कधीच नकार नव्हता जर तो एकदाच असता

आता मानस आहे तो एका महाप्रलयाचा…..
सदेह अस्थिविसर्जनाचा…सागराची गळाभेट घेण्याचा..
राखेतून फ़िनिक्ससारखं उठण्याचा …गगनाला भिडण्याचा..
आसमंत व्यापण्याचा……त्याच्या इतकं मोठ्ठं होण्याचा….

0 comments: