डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय…
जगण्यासाठी माझ्याकडे, फार कमी वेळ उरलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

कट्ट्यावर मित्रांसोबत सिगरेट पिताना,
हे असं होऊ शकेल, असं वाटलं नव्हतं;
मरणाचं भय कधी, माझ्या मनात दाटलं नव्हतं;
आता मात्र माझ्या ह्रदयाचा, अगदी थरकाप झालाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

हॉस्टेलच्या गच्चीवर नेहमीच, आमची मैफल जमायची;
आनंद-दुःख साजरं करण्यासाठी, अलगद मदिरा प्राशन व्हायची;
दारुच्या जागी आज हाती, मृत्युचा प्याला आलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

जगण्याच्या मजेसाठी, मरणाचं भांडवल मी घेतलं;
स्वातंत्र्याच्या नावाखाली, मृत्युलाच जोपासलं;
आज पहिल्यांदाच मी, अंत एवढ्या जवळून पाहीलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….
जगण्यासाठी माझ्याकडे, फार कमी वेळ उरलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

0 comments: