भरावी म्हटलं ओंजळ चांदण्यानी
तर वज्र-मुठ तुझी तु घट्ट झाकली
दाखवावं म्हटलं पौर्णिमेचा चंद्र
तु जाऊन पलंगी गाढ निजली
हरवावं म्हटलं तुझ्या नेत्रांत
तु स्वतःलाच न्याहाळत बसली
निरपेक्ष प्रेमाची परिभाषा तुला कधीच नाही कळाली
तु तर जमीनीवर हरवलेलं नाणं शोधण्यात गुतंली
पहायची होती मला तुला खुल्या स्वातंत्र्यात फ़ुललेली
तु तर आजन्म जखडून ठेवण्यातच धन्यता मानली
म्हणायला हाकेचं इवलसं अंतर
मधे ठाकली भली-मोठी दुर्गम दरी
झेप तुझ्या स्वप्नांची कुंपणापर्यंत
मी अवघी आसमंत-पोकळी व्यापली
जिथे तुझी विचारशक्ती क्षितीजाला टेकली
कल्पनाशक्ती माझी तीथे गगनाला भिडली
मला वाटलं तु चाणाक्ष अन व्यवहारी
पण तु तर भलतीच हिशोबी निघाली
स्वप्नही माझी तु कवडीमोलानं विकली
किंचीत कुठली गोष्ट मनाविरुद्ध गेली
भाड्याची बालकं घेऊन फ़िरणाऱ्या बाईसारखं
सहानभुतीचं भांडवल करायलाही नाही विसरली
ज्या क्षणी तु माझ्या मनाची कास सोडली
असं नाही की मी हिम्मत नाही दाखवली
पण तुझ्या पाशवीपणापुढे तीही फ़िकी पडली
कित्येकदा नयनी मेघांनी दाटी-वाटी केली
सरींवर सर पण एकदाच मनसोक्त बरसली
फ़िकिर खेदाची मग यत्किंचीतही नाही बाळगली
तु वजा झाली तिथे जगण्याची सुरुवात झाली
त्वेषानं तु समुळ नायनाटाची भाषा केली
माझ्याकडून सर्जनशील निर्मीतीच झाली
अगदीच कपाळ करंटी नाहीस तू , तुझ्यामुळे
मला माझ्या कवीतेची नायीका तरी लाभली. ———-
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment