लोक माझ्याशी असं का वागतात?

दाखवायला सभेत माझा चेहरा
मनात हिंस्त्र श्वापदं पाळतात
मी चार माणसांत गेलो तर
मलाच भोंदू तोतया ठरवतात

सदरा माझा घालून आपली
ओंगळ चारित्र्य लपवतात
मी घालून फ़िरलो तर घातला
कुणाचा म्हणून हिणवतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

मेजवानीला प्राणीपक्षी मला
हल-हलाल करायला लावतात
येथेच्छ ताव मारुन संपला की
पाशवी हत्यारा मलाच ठरवतात

दु:ख माझं जड वजनदार म्हणून
बाजारात चढ्या भावाला विकतात
बायकीपणाचं लक्षण म्हणून मग
मला मनसोक्त रडणंही नाकारतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

एखाद्या निरव भयाण रात्री मग
अवघ्या उशांची अभ्रे भिजतात
माझ्या साऱ्या आशाआकांक्षा
मग तिथेच ऊशाला कुजतात
श्रांत झालेली गलीत शरीर-गात्रं
गाढ निद्रेच्या अधीन होतात

अती-उद्दीप्त तरल जाणिवा मात्र
रात्रभर मन समुळ पोखरतात
सकाळपर्यंत कणखर मनाची
मोठ्ठी वारुळं झालेली असतात
बाहेरुन मोहक दिसली तरी
आतुन पुर्ण पोकळ असतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

अशात अगोदर मुंग्या नंतर
महाभुजंग रहायला येतात
चिमुकल्या दाहस्पर्शांचे मग
अतीजहरीले सर्पदंश होतात

लख्ख प्रज्वलित संवेदनाच्या
ठिणग्या मग दिवसरात्र उडतात
पाचोळा मनं त्यांची आग लावली
म्हणून मग मलाच वेठीला धरतात
करायला गेलो आत्महत्या तर गुन्हा
ठरवून मरणालाही लाचार करतात

लोक माझ्याशी असं का वागतात? —–

0 comments: