लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे..
तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे..
उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..
ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे..
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment