चला आता अजून एक कविता लिहू...

चला आता अजून एक कविता लिहू
कोऱ्या सुंदर कागदावर अक्षरांचे डाग पाडू..
शब्दांच्या डब्यांना जोडू भावनेचे ईंजन,
थोडे यातले थोडे त्यातले..कोण करतंय अर्थमंजन !

एकदा लेखणी धरली की मोकाट सुटायचं
कुणी काय म्हणेल म्हणून नाही घाबरायचं
अहो जमाना आता सुधारलाय
कळो न कळो..वा वा म्हणायला शिकलाय….

आपण आपलं लिहीत रहावं
अकलेचे घोडे दौडवत कल्पनेच्या पार जावं
अगदीच थकायला झालं तर इकडे तिकडे पहावं
डोळे मिटून दूध पिणारं काळं मांजर आठवावं

एक मात्र ध्यानात ठेवायचं
लयीतच शब्दांच जाळं विणायचं
शब्द शब्द घसरला पाहीजे
वाचणारा हर एक वाचून सरपटला पाहीजे…

हसतील रडतील हडबडतील वेडे
लिहीतील बोलतील मराठी कविता झुकली विनाशाकडे
आपण त्यांच्या हसण्या-रडण्यालाच ऊपमेत बांधु
खानावळीतल्या आचाऱ्यासारखी आज पुन्हा कविता रांधू
चला आता अजून एक कविता लिहू
कोऱ्या सुंदर कागदावर अक्षरांचे डाग पाडू..
चला आता अजून एक कविता लिहू…….

0 comments: