मन आणि बुद्धी

मन आणि बुद्धी
एकाच आईची दोन मुलं
नाते सख्ख्या भावंडचे
पण वागणे मात्र सावत्रपणाचे

एकाने भावना जपायच्या
तर दुसर्‍याने तार्किकता
एकाने अलगद वाहवत जायचे
तर दुसर्‍याने कर्तव्य-कठोर व्हायचे |१

एकाने हळुवार प्रेमाच्या
गोड स्वप्नात रमायचे
तर दुसर्‍याने वास्तवाच्या
चिमट्यांनी जागे करायचे |२

एकाने वार्‍यासारखे
सतत चंचल वागायचे
तर दुसर्‍याने मेरूपर्वतासारखे
अढळ रहायचे |३

‘एकमेकांवर नित्य कुरघोडी’
दोघांचा हा विचित्र स्वभाव
स्वत:ची श्रेष्ठता जपण्याचा
निरर्थक असा अहंभाव |४

यांच्या या झगड्यात
आपणच भरडले जातो नेहमी
तरीही नाही ठरवू शकत
बुद्धी महान की मन हुकमी |५

भावनेचे सामर्थ्य मनाचे
तर निर्णयक्षमता बुद्धिची
एवढेच समजतं माझ्या सरळ-साध्या बुद्धिला
आणि भोळ्याभाबड्या मनाला….. |६

0 comments: