तू नसतांना ......

तू नसतांना पाऊस का येतो?
क्षणभर मनभर ओलावा देतो
रिमझीम बरसत श्रावण मन होते
मी चींब सयीवर चींब ऋतू होतो..

तू नसतांना पारंबी झुलली
तुझी आठवे क्षणात सरसरली
झुलले पारंबीवर मन वेडे
असा झुला हा कुणास सावरतो?
तू नसतांना...

काल किनारा खोल पुन्हा गेला
तू नसतांना सागर ओसरला
जरी संपल्या लाटा ह्र्दयाच्या
तरी आतुनी उगाच खळखळतो..
तू नसतांना....

तू नसतांना आलेल्या धारा
उगाच मजला छळणारा वारा
तू असतांना कधी न जाणवल्या
तरीच का हा सूड असा घेतो..
तू नसतांना....

तुझे प्रेम म्हणजे असे

तुझे प्रेम म्हणजे असे
उत्तुंग शिखरावर उभे राहणे
तुझे प्रेम म्हणजे असे
खोल खोल दरीत स्वत: ला झोकून देणे जसे
तुझे प्रेम म्हणजे
पहाटे पहाटे फ़ुलावरच्या दवाला टिपणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
नदीच्या अवखळ पाण्याबरोबर वाहत जाणे
जसे तुझे प्रेम म्हणजे असे
भर पावसात भिजणारे पारिजातक जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
कुडकुडणार्‍या थंडीत शेकोटीतले कोळसे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
वार्‍यासंगे उडणारे पतंग जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
उन्हाळ्याच्या रोहीणीत तापणारा सुर्यप्रकाश जसे...

अखेर कमाई...

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले,
शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.

शिवाजीराजे म्हणाले,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले,
मी फ़क्त बौद्धांचा.

टिळक उद्गारले,
मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !