तुझ्या नंतर मी आता दुसरी मुलगी शोधतो आहे

एक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल
आभार तुझे मानतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे

तु सुद्धा आता
दुसरा कुनी शोधला असशील
रोज रोज त्याला
माझ्यासारखा पिळला असशील

तुला माहीत आहे
प्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो
एका मुलीला पटवायला
किती घाम गाळावा लागतो

तुला लिहीलेल्या प्रेमपत्रांची
आजही आठवन ताजी आहे
पुढचे प्रेम करायला
मला त्यांची गरज आहे

आपल्या प्रेमापायी तुला दिलेले
सर्व GIFT सुद्धा हवे आहे
अर्ध्या किंमतीत सुद्धा त्यांना
विकत घ्यायला मी तयार आहे

तुझ्यावर केलेला सर्व खर्च
आजही माझ्याकडे तयार आहे
CHECK घ्यायचा की CASH घ्यायची
यावर विचार सुरु आहे

अरे हो…
तुझा तर माझ्यावर
कोनताही खर्च नसेल
कारन पर्स नेहमी घरी विसरने
तुझे आजही सुटले नसेल

तुझ्याकडे मी दिलेला
माझा फोटो मला हवा आहे
मुलींना IMPRESS करायला
तोच तर एक दुवा आहे

तुझ्याकडुन मिळालेल्या सर्वच वस्तुंचा
माझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील
तुला जसे PROPOSE केले होते
तसेच मी तिला पन करील

म्हनुन मला माझे
सर्व तु परत कर
मला अजुन एक मुलगी पटवायला
माझ्यासाठी प्रार्थना कर

तुझे प्रेम संपल्यावर
दुसरे प्रेम मी शोधतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे ……………

दोन थेंब...

दोन थेंब...
पावसाचे दोन थेंब ढगातुन निघाले.वार्याच्या प्रवाहाशी झुंजत, ढगाच्या तुकड्यांना चुकवत, पृथ्वीच्या दिशेने.दोघेही गप्प होते.एकाला रहावल नाही, त्यान संवाद सुरु केला-"आता पृथ्वीवर एकत्र प्रवास करायचाच आहे, बोल ना काहीतरी."
मग दूसरा बोलला,"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय."
"आता काही मैलांचा प्रवास उरलाय, आता अंतर्मुख होउन काय करणार आहेस?"
"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.आपला वेग आपल्या हाती नाही, आपली दिशा आपल्या नियंत्रनात नाही आणि

कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे!""मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेस?त्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली, की अनंतात विलीन होउन जाऊ."
"त्याने काय होणार? कपाळमोक्ष टळणार आहे का आपला?"
"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची!"
"का?तुला नाही लागुन राहिली आहे काळजी?"
"नाही.आपला ढगात जन्म होतो, त्याच क्षणी अपल भवितव्य ठरलेल असत.ढगाला आपला भार असह्य झाला, की तो आपल्याला सोडून देणार.मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.यात आपण काय करू शकतो?"...
"पृथ्वीवर पाण्याला जीवन म्हणतात आणि जीवनाच्या थेंबाला स्वताचा जीव राखन्याच स्वातंत्र्य नाही,हे अजबच."
"हे बघ, अपाला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय? तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत!"
"मी थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत."
"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,एवढ समजुन घे.तू म्हणजे Hydrogen चे दोन रेणू आणि Oxigen चा एक! तलावातही आणि समुद्रातहि!"

"बरा भेटलास,बोल,काय गप्प मारणार होतास माझ्याशी?"
"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत.मी तुला प्रश्न विचारतो, आपण का पडतो?"
"हा काय प्रश्न झाला?""म्हणजे अस बघ, बेडूक घसे फुगवून त्यांच्या प्रेयासिला बोलावतात आणि आपली आराधना करतात म्हणुन आपण पडतो, की एखादी आजी देव पाण्यात बुडवून बसते म्हणुन आपण पडतो..."
"अरे तुला काय खूळ लागल का? आपण पडतो त्याच्याशी यापैकी कशाचाही संबंध नाही.निसर्गचक्र म्हणुन पडतो आपण."
"चूक!"
"हे बघ, आपण पडतो त्याला उगाचच काहीतरी महान अर्थ
चिकटवत पडू नकोस."
"पण, समज आपण स्वताचा असा समज करुन घेतला, की आपण त्या
बेडकांसाठीच पडतो आणि आपल्या वर्षावात भिजुन बेडूक-बेडकी प्रनयात धुंद होतात......मादी अंडी देते.हजारो बेडूक जन्मतात, ते किड्यांना खाऊन पृथ्वी स्वच्छ ठेवतात. त्या बेडकांना खाऊन साप जगतात..."

"बापरे, मी हा असा विचारच केला नव्हता कधी..."
"समज, कुणीतरी पर्जन्यदैन्य होता म्हणुन आपण पडलो.पाउस पडून काही कोणाचा व्यक्तिगत फायदा नाही.मग यांच्यामुळे आपण पडलो, अस समजायला काय हरकत आहे?"
"खरच, काहीच हरकत नाही आणि एखादी प्रेमळ आजी जगासाठी देवाला पाण्यात बुडवून ठेवणार असेल, तर तेवढ्यासाठीच मी पडतो म्हणायला तर मला आनंदच वाटेल!"
"आता कस बोललास? नाही तरी आपण पडणार तर आहोच,मग त्या
पडण्याला असा अर्थ दिला तर पडण्याला आणखी गम्मत नाही का येणार? आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे आहे, तर तू कुठे पडशील?"
"हे काय भलतच?"
"अरे गम्मत! ज़रा विचार तर करुन बघ.कुठेतरी दोन धुंद जीव एकमेकांना लगटून समुद्राकाठी फिरत असतील तर नेमक जाउन तिच्या ओठांवर पड़ाव,भेगाळलेली जमीन तहानेन व्याकुळ होउन आकाशाकडे पाहत असते तिच्या तृप्तीचा पहिला थेम्ब व्हाव,एखाद अवखळ मूल खिडकित बसून तळहात गजातुन बाहेर काढत असेल तर त्याच्या इवल्या हातांवर जाउन विसावाव..
...एखाद नक्षिदार फुल पाखरू पंख पसरून फुलावर बसल असेल तर त्याचे रंग भिजवून टाकावेत...काहीही!" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला,"अरे

आपले आयुष्य पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी!"
एक आजोबा हातात पिशवी सांभाळत, वाऱ्याने उलटी होत असलेली

छत्री सावरत कसेबसे चालत होते.पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.चाफ्याच डौलदार झाड़ दुधाळ फुल अंगावर लेवून हिरवी वस्त्र नेसून सजल होत.भार सहन न होउन पान वाकल आणि

थेंबन जमिनीवर उडी घेतली.तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.दूसरा म्हणाला,"आता मी वाट बघतोय, वाफ होउन ढगात जाण्याची आणि पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल!".

काय म्हणता, काळ बदलला?

काय म्हणता, काळ बदलला?
पुर्वीचा काळ सुखाचा
आता नाही कोण कुणाचा
तोच प्रवास, तोच रस्ता
वीट आलाय या जीवनाचा.

मान्य आहे, इंधन महागलंय, प्रदूषण वाढलंय
पण कधी पहाटे लवकर उठून
घनःश्याम सुंदरा ऐकलंय?
ते राहू द्या, सुर्योदयाचं मनोहर रुप
शेवटचं केव्हा पाह्यलंय?

मान्य आहे, तुम्ही खूप धावपळ करता,
एकाच वेळी अनेक ठिकाणी असता
पण पाहिलाय कधी पौर्णिमेचा चंद्र
कोजागिरी वगळता?
तृण मखमालीवर आकाश पांघरुन
मोजल्यात कधी चांदण्य़ा रात्र सरता?

मान्य आहे, पाऊलवाटांचे हमरस्ते झालेत
अन मनाचे कप्पे अरुंद झालेत.
जरी करीत असाल तुम्ही इंटरनेटवर हजारो मित्र
पाठवितही असाल ढिगांनी ई-मेल अन चित्र
पण कुणाला पाठवलंय कधी एखादं
पान्नास पैशाचं अंतरदेशीय पत्र?
अन लुटलाय का कधी पोस्टमन कडून
शुभेच्छा तार स्विकारल्याचा स्वानंद?

मान्य आहे, जीवनमान बदललंय,
पालटलाय साराच नूर
आम्हालाही पडते आजकाल
डिजे पार्ट्यांची भूल
पण ऐकलाय का हो कधी
रेडियोवर अकराचा बेला के फ़ूल?

मला नाही कळत असं काय झालंय
की ज्यानं आपलं अवघं विश्वच बदललंय

सुर्य नाही बदलला, चंद्रही नाही बदलला
काळ आहे तिथेच आहे तो नाही बदलला
तुमचा आमचा पहाण्याचा नजरीया बदलला.

असंच कधी काळी…

असंच कधी काळी जीवनाचा प्रवास करता करता
थांबलो एका मुग्ध वळणावर क्षणभर विश्रांती करता.

नकळत कानी पडली ती सुरेल संगीत सरीता
उडालेली धांदल तीची खट्याळ वाऱ्याशी झुंजता
पाहीलं तीला मी काहीसं अनावृत्त पदर सावरता
निसर्ग-निर्मात्याची अप्रतीम स्वर्गीय कलाकृती ती
कसं यावं ते आरस्पानी सौंदर्य शब्दात पकडता

नाहीच जाता आलं पूढे मला मग तिला डावलता
वाट संपली, प्रवास थांबला, मुक्काम विसरला,
तिथेच कडेला मी दिवास्वप्न महाल बांधला
श्रावणमासी हर्षमानसी हृदयी वसंत फ़ुलला
चोहीकडे उत्सवक्रिडा आसमंती प्रणय बहरला
नकळे, न रुचे काहींना तो आनंद सोहळा

नतद्रष्टांनी डाव साधला, एके रात्री धरण-बांधच फ़ोडला
स्वप्न-महाल विखुरला, अवघा आसंमत आक्रंदला
हा करुण सोहळा सर्वांनी मग काठावर बसुन पाहिला
जाता येता आजही पडतात शेवाळलेले भग्नावशेष दृष्टीला

माझं दिवास्वप्न आजकाल वापरलं जातंय स्मशानभूमीला
शकून म्हणून माझ्या संवेदनांचा दाहसंस्कार होता शुभारंभाला
कृतज्ञता म्हणून अमर केलंय नाव माझं देऊन प्रवेशद्वाराला
खरं तर,कायमचं जखडून टाकलंय भूता-खेतांच्या सानिध्याला

नाही म्हणायला टांगलेली असतात काही वटवाघळं सोबतीला
कधी काळी, चार लोकही येतात आप्तेष्ट म्हणून नक्राश्रू ढाळायला
मृत्यूला माझा कधीच नकार नव्हता जर तो एकदाच असता

आता मानस आहे तो एका महाप्रलयाचा…..
सदेह अस्थिविसर्जनाचा…सागराची गळाभेट घेण्याचा..
राखेतून फ़िनिक्ससारखं उठण्याचा …गगनाला भिडण्याचा..
आसमंत व्यापण्याचा……त्याच्या इतकं मोठ्ठं होण्याचा….

वेदना अंतरी ची…

केल्या असतील चुका
प्रीतीपण केली.

वेदना अंतरी ची मज
आता साहवत नाही
गुन्हा असा मी काय केला
मज सांगाल काय कोणी?

हळहळती सारे परी
चालत मात्रा कुणाचीही नाही

अश्वत्थाम्याच्या भाळी जखम जशी
मज ही खोलवर जाळीत जाई
बहू म्हणती अमरत्व वरदान असे हे
मज साठी हा उ:शाप ही नाही

साधावयाचे त्यास जे
ते साधलेच नाही

विद्ध करुनी मज
पारधी ही मुक्त नाही
खंत एकच त्याची, स्वत्व परी
माझे त्याच्या काबूत नाही

युध्द असे हे यातूनी
सुटका कुणाचीच नाही

उभा कुरुक्षेत्री परंतू
अर्जुन मी नाही
साधु कसे लक्ष्य
करुनी शिखंडीस सामोरी?

निशब्द असा मी
पाहतो वाट पहाटेची…

विजयी अखेर प्रीतीच होईल
यात शंकाच नाही
परंतू काळ किती जाईल
मज सांगाल काय कोणी?

वेदना अंतरी ची मज
आता साहवत नाही

मैत्रीमधले अश्रू

असते मतलबी, दुनिया ही सारी,
पण आपले, निराळे, असतातही काही,
दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

जिथे असते श्रद्धा आणि भक्ति,
असे पुजनिय, असतात काही व्यक्ति,
क्षणिक असते, अबोल्याची सक्ति,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,
कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,
मनास होत नाही, कधी येथे क्षिती,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,
विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,
आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी…

तु वजा झालीस तिथे….

भरावी म्हटलं ओंजळ चांदण्यानी
तर वज्र-मुठ तुझी तु घट्ट झाकली
दाखवावं म्हटलं पौर्णिमेचा चंद्र
तु जाऊन पलंगी गाढ निजली
हरवावं म्हटलं तुझ्या नेत्रांत
तु स्वतःलाच न्याहाळत बसली

निरपेक्ष प्रेमाची परिभाषा तुला कधीच नाही कळाली
तु तर जमीनीवर हरवलेलं नाणं शोधण्यात गुतंली
पहायची होती मला तुला खुल्या स्वातंत्र्यात फ़ुललेली
तु तर आजन्म जखडून ठेवण्यातच धन्यता मानली

म्हणायला हाकेचं इवलसं अंतर
मधे ठाकली भली-मोठी दुर्गम दरी
झेप तुझ्या स्वप्नांची कुंपणापर्यंत
मी अवघी आसमंत-पोकळी व्यापली
जिथे तुझी विचारशक्ती क्षितीजाला टेकली
कल्पनाशक्ती माझी तीथे गगनाला भिडली

मला वाटलं तु चाणाक्ष अन व्यवहारी
पण तु तर भलतीच हिशोबी निघाली
स्वप्नही माझी तु कवडीमोलानं विकली
किंचीत कुठली गोष्ट मनाविरुद्ध गेली
भाड्याची बालकं घेऊन फ़िरणाऱ्या बाईसारखं
सहानभुतीचं भांडवल करायलाही नाही विसरली

ज्या क्षणी तु माझ्या मनाची कास सोडली
असं नाही की मी हिम्मत नाही दाखवली
पण तुझ्या पाशवीपणापुढे तीही फ़िकी पडली
कित्येकदा नयनी मेघांनी दाटी-वाटी केली
सरींवर सर पण एकदाच मनसोक्त बरसली

फ़िकिर खेदाची मग यत्किंचीतही नाही बाळगली
तु वजा झाली तिथे जगण्याची सुरुवात झाली
त्वेषानं तु समुळ नायनाटाची भाषा केली
माझ्याकडून सर्जनशील निर्मीतीच झाली
अगदीच कपाळ करंटी नाहीस तू , तुझ्यामुळे
मला माझ्या कवीतेची नायीका तरी लाभली. ———-

पाऊस ...

पाऊस, कालपासून भलताच पेटलाय !
पाऊस ...
ये म्हटल्याने येत नाही ...
जा म्हटल्याने जात नाही ...

पाऊस ...
माझ्याशी असाच तुसड्या सारखा वागतो
मी रेनकोट घरी ठेवला कि
हात धुउन मागे लागतो.

पाऊस ...
मी हजारदा बजावलं तरी
मी नसताना तिला एकटी गाटतो ...
तिच्या छत्रीतून लगट करतो.
काल असाच त्यानं मुक्काम थाटला ...
धूसमुसळेपणान तिला खेटला.

वाटलं आता हिचा तोल जाणार ....
हि गरम होणार ...
हिला ताप येणार.

पण झालं भलतंच ...!
पाऊस ...
जेंव्हा तिच्या उष्ण श्वासाना भेटलाय.
पाऊस, कालपासून भलताच पेटलाय !

मी, दोष कुणाला देणार ...?
चूक माझीहि नसते ... तशीच त्याची हि नाही ... !
आणि ती तर नेहमीप्रमाणे नामानिराळी.

त्याला मी म्हणतो काळोख!!!!

तुम्ही सुर्य नसला की
त्याला म्हणता काळोख

रात्रीवरच्या उजेडाच्या ग्रहणाला
त्याला म्हणता काळोख

चंद्र तार्‍यांवीन असतो तो
त्याला म्हणता काळोख

बंद पापण्यांआड स्वनंउशी देतो
त्याला म्हणता काळोख

कवितेसाठी सर्रास प्रतिमा देतो
त्याला म्हणता काळोख

मग प्रश्न उरतो,

आंधळ्या डोळ्यांमागचा तो
कोणता असतो काळोख??????

निर्विवाद खरा
उजेडाला हरविणारा
उजेडातही जाणवणारा
रविराजाला लाजवणारा

त्याला मी म्हणतो काळोख!!!!

अन आता तुम्ही?????????

आजकाल सारखं असं का होतं?

मन माझं बिलकूल थाऱ्यावर नसतं
आरशात पाहून माझं मलाच हसू येतं

कधी ते इतकं बहूरंगी की जणू
सप्तरंगी इंद्रधनुष्यही त्यापूढे फ़िकं असतं

कधी ते इतकं चंचल की जणू
फ़ुलांवर उडणारं फ़ुलपाखरू असतं

कधी ते इतकं खट्याळं की जणू
नवतरूणीचा सावरणारा पदर असतं

कधी ते इतकं बिलंदर चोर की जणू
केतकीच्या बनी नाचणारा मोर असतं

कधी ते इतकं अधीर की जणू
नवविवाहितेच्या वेणीतलं फ़ूल असतं

कधी ते इतकं हट्टी की जणू
गरोदर मुलीला हवसं चिंच अन बोर असतं

कधी ते इतकं कोमल की जणू
अती-स्निग्ध दुधावरची साय असतं

कधी ते इतकं लोभस की जणू
जमीनीवर रांगणारं गोंडस मुल असतं

कधी ते इतकं वेंधळं की जणू
जत्रेत हरवलेलं शेबडं पोर असतं

कधी ते इतकं अवजड की जणू
दुभत्या गायीच्या गळ्यातलं लोढणं असतं

कधी ते इतकं बधीर की जणू
ओल्या घावावरील लादीचा बर्फ़ं असतं

कधी ते इतकं कठोर की जणू
भल्या भल्यांचा कर्दनकाळ असतं

कधी ते इतकं आशयघन की जणू
अवजड संदर्भ ग्रंथातलं शेवटचं पान असतं

कधी ते इतकं विषण्ण होतं की जणू
गावच्या स्मशानभूमीतलं रिकामं बाकडं असतं

मलाच माहित नाही हे नक्की असं का असतं
तरीच आरशात पाहिलं की माझं मलाच हसू येतं

आजकाल सारखं असं का होतं? ———-

लाख सलाम तुझ्या-माझ्या मैत्रीला...

तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
भीती नाही वाटली अंधाराची
अन अंधारात चालताना देखिल
ओढ़ होती प्रकाशाची.......
तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
पावलो पावली मिळाला विश्वास
अन मिळाला धीर संकटात .....
तुझी-माझी मैत्री बनली
एक फुलांचा नाजुक वेल
म्हणुन आपल्या मैत्रीचा
आहे अनोखा खेल......
पण तू हाथ धरलास
नि जिव माझा खुलुन आला
माझ्या आयुष्याच्या वृक्षावर
जणू गुलमोहरच खुलुन आला......
तूच शिखवलीस मला
जगण्याची खरी कला
म्हनुनच तुझ्या-माझ्या मैत्री साठी
लाख सलाम तुला.......

मुक्काम….

जाताच पक्षी निघुन दुर देशी
झंजावाती घरटं उन्मळून पडलं
त्यांच्या मुक्कामी मग मिच
भेटायला जायचं ठरवलं !

एकदा मुक्काम ठरल्यावर..
………चालायचं बळ
….वाटेनंच पावलांना दिलं!

येताच मुक्काम जवळी
पाऊल ठणकेनं कण्हू लागलं !

पावलं बिचारी कदाचित
अंगच्या सवयीनं आपोआप
वाट चालतीलही असं वाटलं !

फ़क्त् डोळ्यातल्या पाण्यानं
..समोरचा मुक्काम अंधूक
झाला नाही म्हणजे मिळवलं !

तू परतून येवू नकोस

तू नकळतपणे आलीस माझ्या
हृदयाच्या प्रांगणात चोरपावलानं
अन् समोरुन नाही तर एका
बेसावध क्षणी,तेही मागच्या दारानं

अजाणत्या वयात नाही कळालं
घ्यावा कुणाचा कौल?
बुद्धी नेहमीच सांगत आली
विचार कर खोल
पण हृदय घसरलं की
न कळे गेला मनाचा तोल
नंतर लक्षात आलं की तुला
नसे या कशाचंच मोल

अजुनही स्मरतोय मला
तुझा तो अलवार स्पर्श
अन् त्या मागोमागचं
निष्पाप, निरागस हास्य
कसं विसरू मी तुझं ते
मधुर निर्झर भाष्य
अन् नकळतपणे बाहेर
पडलेलं लाडीक “इश्श्य”

खरं सांगू??, तुझं हे प्रत्येक असणं
मी जपलंय वहीतल्या मोरपिसांसारखं
अगदी तुझं झिडकारणंही झेललंय मी
गुलाबाच्या काट्यासारखं
ते आठवण करुनं देतात मला
जखम अजूनही रक्तरंजीत असल्याचं

जरी तूला जाणवलं असेल
आताश्या, मला संवेदना असल्याचं
तू परतून येवू नकोस सोंग घेऊन
जसं काही झालंच नसल्याचं
खरंच, मला नाही झेपायचं दुःख
आणखी, हेही स्वप्न भंगल्याचं ————-

मराठी मुलगा ...

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पन जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात
पन जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पन जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !!

माझं काय, तुमचं काय..

माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

तिचं बोलणं; तिचं हसणं;
जवळपास नसूनही जवळ असणं
जीवणीशी खेळ करीत
खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !!

खट्याळ पावसात चिंब न्हायच !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

केसांची बट तिने
हळूच मागे सारली….
डावा हात होता की
उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,
प्रत्येक कण मनात साठवतो !

ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारंच आठवतो
प्रत्येक क्षण मनात साहवतो !

आठवणींच चांदणं असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

तिची वाट बघत आपण उभे असतो…..
ठरलेली वेळ कधीच टळलेली असते !
येरझाऱ्या घालणं सुद्धा शक्य नसत रस्त्यावर !
सगळयांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!

माणासं येतात, माणासं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात !

उभे असतो आपण आपले मोजीत श्वास
एक तास ! चक्क अगदी एक तास !!

अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!

इतकी शांत ! इतकी सहज !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळीच
आली होती जशी काही !!

मग तिचा मंजूळ प्रश्न :
“अय्या ! तुम्ही आलात पण?”
आणि आपलं गोड उत्तर:
नुकताच ग ! तुझ्या आधी काही क्षण !

काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायच !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

एकच वचन कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !
तरी सुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा हवे असतात !!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लागते,
फ़ुलांची नाजूक गत,
मनात आपल्या वाजु लागते !!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ मनावर भरुन जातं ;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?

प्रेम म्हणजे नक्की काय असतं?
तुझ्या-माझ्या मनातल्या
प्रत्येक निरुत्तरित प्रश्नाच उत्तर असतं!
आपल्या प्रत्येक सुखदुःखात
आपला आधार असतं ,
का …
परस्परांवरच्या विश्वासानं
द्रुढ होत जाणारं नातं असतं?

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
एक्मेकांच्या आठवणीत वाहीलेला
एक छोटासा आसवं असतं?
की…
आयु्ष्यभर एक्मेकांच्या सोबतीनं जगण्याचं
दिलेलं एक वचन असतं?

हे सगळं म्हणजे प्रेम असतच
पण ते एव्हढच नसतं,
ते असतं एक पुर्ण सत्य
आपल्या जीवनाला-जगण्याला अर्थ देणारं!!

डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय…
जगण्यासाठी माझ्याकडे, फार कमी वेळ उरलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

कट्ट्यावर मित्रांसोबत सिगरेट पिताना,
हे असं होऊ शकेल, असं वाटलं नव्हतं;
मरणाचं भय कधी, माझ्या मनात दाटलं नव्हतं;
आता मात्र माझ्या ह्रदयाचा, अगदी थरकाप झालाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

हॉस्टेलच्या गच्चीवर नेहमीच, आमची मैफल जमायची;
आनंद-दुःख साजरं करण्यासाठी, अलगद मदिरा प्राशन व्हायची;
दारुच्या जागी आज हाती, मृत्युचा प्याला आलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

जगण्याच्या मजेसाठी, मरणाचं भांडवल मी घेतलं;
स्वातंत्र्याच्या नावाखाली, मृत्युलाच जोपासलं;
आज पहिल्यांदाच मी, अंत एवढ्या जवळून पाहीलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….
जगण्यासाठी माझ्याकडे, फार कमी वेळ उरलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

नेहमीच कसं हसवायचं…??

तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं…
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…??

समोरचा तो हसला………… ….नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर…
हसवणाराच् मी कसला…

माणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं…
दू:ख दाबून ओठांमध्ये , त्यांतच हसून दाखवायचं
पण …. श्वास जड होतो जेव्हा—…तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

मी रडू लागलो जेव्हा …
ते मात्र हसत होते…
कारण, माझ्या रडण्यामधले
व्यंगच त्यांना दिसत होते…

मनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो वसंत…….स्वप्नंच् फक्त पहायचं
पण; ……..ह्रूदयातच ढग दाटून येतो….तेव्हा रे काय करायचं….???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

म्हणी...

. एक ना code, भाराभर bugs
· code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
· मरावे परी bugs रूपी उरावे
· आपलाच code आणि आपलेच bugs
· आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste
· इकडे code तिकडे release
· project आला होता, पण deadline आली नव्हती
· Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही
· अतीशहाणा त्याचा code रिकामा
· Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’
· code कळला तरी bugs मिळत नाहीत
· bonus नको पण workload आवर
· स्वतः coding केल्याशिवाय output दिसत नाही
· दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वतःच्या कोडातले errors दिसत नाहीत
· दिसतं तस नसतं म्हणूनच client फसतं

ओळखा पाहू...

मध्यरात्री दारावर टकटक
दार उघडलं
पडून-पडून जख्मी झालेला पाऊस
सरळ आत आला
'ती' कुठाय म्हणाला…
मी म्हटलं 'नाहीय'… 'ती नाहीय'
'म्हणजे?'
'म्हणजे ती आली नाही कधीच इथे'
'पण ती म्हणाली होती मला
इथेच भेटीन म्हणून… एनी वे! असं कर…
माझे ढग घे
वेशांतर कर
बरसून ये ती असेल तीथे… मी थकलोय…'
मग मी बाहेर पडलो
रात्रभर बरसबरस बरसलो कुठेकुठे
सकाळी घरी परतल्यावर पाऊस म्हणाला,
"जा ना साल्या जा…
माझ्याहून तूच चांगला बरसतोस…"
आता…
माझ्या खोलीत
ढगांशिवाय राहणारा 'तो'
आणि असा भणंग बरसत फिरणारा मी…
ओळखा पाहू…
खरा पाऊस कोण?

आज अस वाटलं की ...

आज अस वाटलं की कोणी जिवनात माझ्या डोकाउन गेलं
आज अस वाटलं की कोणी मनात माझ्या पाहून गेलं
माझे डोळे बदं होते त्यावेळी आणि श्वास जणू यांबला होता
मग असं वाटलं की कोणी ह्दयाचे टोके कोणी मोजून गेलं
आज अस वाटलं की कोणी जणू केस माझे कुरवाळून गेलं
आज अस वाटलं की कोणी जणू पदराने मला झाकून गेलं
मला आटवतयं उश्याकडे कागंद होती आणि हातात पेन होता
आज अस वाटलं की मानेखाली मग उशी कोणी सरकवुन गेलं
आज अस वाटलं की कोणी जणू दु:ख माझं जाणून गेलं
आज अस वाटलं की कोणी जणू डोळे माझे पुसून गेलं
हो ती नक्कीच माझी माय होती माझी आई आणी कोणी नाही
मग पदराने डोळो पुसले कोणी आणि देवापुटे हात कोणी जोडून गेलं.

लोक माझ्याशी असं का वागतात?

दाखवायला सभेत माझा चेहरा
मनात हिंस्त्र श्वापदं पाळतात
मी चार माणसांत गेलो तर
मलाच भोंदू तोतया ठरवतात

सदरा माझा घालून आपली
ओंगळ चारित्र्य लपवतात
मी घालून फ़िरलो तर घातला
कुणाचा म्हणून हिणवतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

मेजवानीला प्राणीपक्षी मला
हल-हलाल करायला लावतात
येथेच्छ ताव मारुन संपला की
पाशवी हत्यारा मलाच ठरवतात

दु:ख माझं जड वजनदार म्हणून
बाजारात चढ्या भावाला विकतात
बायकीपणाचं लक्षण म्हणून मग
मला मनसोक्त रडणंही नाकारतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

एखाद्या निरव भयाण रात्री मग
अवघ्या उशांची अभ्रे भिजतात
माझ्या साऱ्या आशाआकांक्षा
मग तिथेच ऊशाला कुजतात
श्रांत झालेली गलीत शरीर-गात्रं
गाढ निद्रेच्या अधीन होतात

अती-उद्दीप्त तरल जाणिवा मात्र
रात्रभर मन समुळ पोखरतात
सकाळपर्यंत कणखर मनाची
मोठ्ठी वारुळं झालेली असतात
बाहेरुन मोहक दिसली तरी
आतुन पुर्ण पोकळ असतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

अशात अगोदर मुंग्या नंतर
महाभुजंग रहायला येतात
चिमुकल्या दाहस्पर्शांचे मग
अतीजहरीले सर्पदंश होतात

लख्ख प्रज्वलित संवेदनाच्या
ठिणग्या मग दिवसरात्र उडतात
पाचोळा मनं त्यांची आग लावली
म्हणून मग मलाच वेठीला धरतात
करायला गेलो आत्महत्या तर गुन्हा
ठरवून मरणालाही लाचार करतात

लोक माझ्याशी असं का वागतात? —–

तु गुंतलीस किनार्‍यावर……………….

तु गुंतलीस किनार्‍यावर,
या नजरेच्या जाळ्यांत,
मी खोल बुडालो,
प्रेमाच्या या महासागरात,

येणार्‍या प्रत्येक आहोटीबरोबर,
तुला घट्ट पकडुन बसण्याचा हा अट्टहास,
तर उठणार्‍या दर भरतीसमवेत,
तुला मिठीत सामावन्याचा केलेला अनाहत प्रयास,

या चक्ररुपी वादळाबरोबर,
तुझ्यापासुन दुरावण्याची ही अघोरी भीती,
याच वेळी या गतीमान भोवर्‍यामध्ये,
स्वतःचे आत्मभान हरवण्याची ही स्थिती,

कधी असतेस तु सीमारेषा,
दोघांच्यामधील नातं संपवुन टाकणारी,
तर असतेस कधी तु जिवनरेषा,
आपलं नविन जग सुरु करणारी,

तुझी वाट पाहणारा,
मी निरंतर एक खलाशी,
तु आहेस एक किनारा,
तुला शोधणारा मी दिशाहीन एक प्रवासी………..

तु गुंतलीस किनार्‍यावर,
या नजरेच्या जाळ्यांत,
मी खोल बुडालो,
प्रेमाच्या या महासागरात,

म्हणून ते आंनंदाश्रू…..

प्रसववेदनांनंतर जन्म देते
………………म्हणून ती आई

रोज रात्रीनंतर येते
………………म्हणून ती सकाळ

बिकट वळणावळणांची असते
………………..म्हणून ती वाट

अतीदूर क्षितीजापाशी टेकते
………………..म्हणून ते आकाश

प्रत्येक क्षणोक्षणी रंग बदलते
…………………म्हणून ते जीवन

निखळ अश्रूंशी नाते जोडते
………………..म्हणून ते खरं प्रेम

भाबडं प्रेम व्यक्त करतात
…………….म्हणून ते आंनंदाश्रू ——–

नजरेला नजर मिळते जेंव्हा

नजरेला नजर मिळते जेंव्हा
प्रेमाला नवे घर मिळते तेंव्हा
ह्दयाच्या गोष्टी नजरेनेच होतात
प्रेमचे प्रेत्येक घोट ते नजरेनेच पितात
आसाच सुरु होतो प्रेमाचा प्रवास
सतत हवा असतो तिचाच सहवास
मग खेळतो नशिब आपली खेळी
ती दूर करतो त्यांची जोडी
दोन जीव दुर होतात मिलनाच्या क्षणात
पण विरह खुप असतो नशिबाच्या मनात
दोघे भेटतात न बिछ्डण्याच्या प्रणात
ते घर बाधंतात प्रेमाच्या गावात
एक जन्म ही कमी अस्तो,
प्रेम समजून घ्यायला
एक क्षण खुप अस्तो
नजरे मिळायला
आजही आहे मी पहिल्या नजरेच्या शोधत
मला पण घर बाधांच्य आहे
प्रेमाच्या गावात

खरं सांगू, मला आवडतं!!!!

तुझं असणं,
तुझं हसणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

पावलात अडखळणं,
दगडाला लागलं म्हणुन अश्रु गाळणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

निरर्थक बडबड करणं,
चांभारालाही मग ‘काका’ म्हणणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

एकांती किनारी बसणं,
स्वप्नांच्या होड्या करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

फुलपाखरांशी गप्पा मारणं,
त्यांना आपल्यातीलच समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

तुझं लटकं रागावणं,
चिडले आहे भासवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

हिशोबात हरवणं,
बोटांवर बेरीज करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

अंधाराला घाबरणं,
चंद्राला पापण्यांत लपवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

सिनेमात सगळं विसरणं,
माझ्या खांद्याला रुमाल समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

तुझ्यासमोर मनाचा आरसा होणं,
शब्दांचा भार हलका होणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

आता तुझं नसणं,
मग अश्रुंना गोंजारणं,
खरं सांगू, मला जड ज़ातंय!!!!

मन उधाण वा-याचे

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहि-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर - शंकर महादेवन
चित्रपट - अगं बाई …. अरेच्चा ! (२००४)

कधी पाह्यलंय तूला मी….

कधी पाह्यलंय तूला मी,आभाळाएवढं मोठ्ठं होताना
तर कधी निराशेच्या गर्तेत सागरतळाशी जाताना

कधी पाह्यलंय तूला मी,वर्षा-मेघासारखं गरजताना
तर कधी लयबध्द श्रावण-सरींसारखं बरसताना

कधी पाह्यलंय तूला मी, प्रेम करुणेचा सागर होताना
तर कधी तिरस्कारानं प्रलयासारखं बेभान होताना.

कधी पाह्यलंय तूला मी, हर्षाचा अम्रृत घट भरताना
तर कधी अतीव वेदनेचा विष-प्याला रिचवताना

पाह्यलंय तूला मी, अशा कित्येक ऋतू-रुपांत
उन्हा-पावसात, अन इंद्रधनुष्याच्या रंगछटांत

पण तरीही अनोळखी वाटतेस तू मला
जसं काही, प्रथमच पहातोय मी तूला. —–

दगडांना मी फ़ुलं समजतो

दगडांना मी फ़ुलं समजतो
परी मी कवि नाही जनांनो
मी एक वेडा दगड मारणांरा
फ़ुलं समझून दगड मारतो.

मृगजळांनी मी भुमी भिजवतो
अख्खं आभाळ डोळ्यात साठवतो
पसरवुन जाळे पाणवट्यावर मी
चद्रंबिबं माझ्या जाळ्यात पकडतो.

स्वप्नांत पिऊन अमृत अमर होतो
मी चद्रांलाही कधी काजवा समजतो
मला ना पारख ना जाण चागंल्याची
समजुन कल्पवृक्ष बाभळीस कवटाळतो.

दोन शब्दांसाठी सारं विश्व धुडांळतो
नाहीच मिळाले तर अक्षंर गुडांळतो
मी कुठे शब्दांचा सौदागर सा-यापरी
सौदागरापुढे शब्दांचा सौदा मदांवतो.

आज मला कोण इथे ओळखतो
कोंण मला या शब्दांत इथे शोधतो
मी तर एक शब्द खूळा खुळ्यातला
माझा शब्दही मला खुळाच ठरवतो

अचानक बरसणाऱ्या पावसाचं…

अचानक बरसणाऱ्या पावसाचं
देखील स्वागतच असतं.
अणू-रेणू सुखावणाऱ्या अमृताचं
कौतूक धरतीला उमगतं.

हातचं राखून ठेवणाऱ्याला
काहीच मिळत नसतं.
तोलून मापून चालणाऱ्या
सुख हुलकावण्या देत रहातं.

खऱ्या प्रेमात काही द्यायचंही नसतं
काही घ्यायचं ही नसतं.
क्षणभर मिठीत विसावायचं असतं
क्षणभर सत्य विसरायचं असतं

मला काय त्याचे?

पेट्रोल महागणार …
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?

ओ.बी.सी. कोटा वाढणार …
माझे शिक्षण झाले … मला काय त्याचे?

जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला …
जेसिका माझी कोणीच नव्हती … मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला …
मी कुठे पैसे गुंतवले होते … मला काय त्याचे?

हिंदू देवतांची विटंबना होतेय …
मी धर्मांध नाही … मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या …
मी काश्मीरी नाही … मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही …
मी तर नोकरदार आहे … मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय …
आपल व्यवस्थीत चाललय ना … मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत …
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? … मला काय त्याचे?

या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे …
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे …
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे …
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे …

मला काय त्याचे मला काय त्याचे …
म्हणत म्हणत जगायचे …
आणि आपले रोजच …
कुढत कुढत मरायचे …

आम्ही अशा देशात राहतो...

मित्राने पाठवलेल्या इंग्रजी ई-मेलचा मराठी अनुवाद...

आम्ही अशा देशात राहतो:

* जिथं पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही लवकर तुमच्या घरी "पिझ्झा" पोह्चतो,
* जिथं वाहन कर्ज ५% तर शैक्षणिक कर्ज १२% नी मिळतं,
* जिथं तांदुळ ४० रु. किलो तर "सिमकार्ड" मोफत मिळतं,
* जिथं एक लखपती लाखो रुपये देवुन क्रिकेटचा संघ विकत घेतो, मात्र तीच रक्कम दान नाही करत,
* जिथं पायात घालायच्या चपला/ बुटं वातानुकुलित दुकानात विकली जातात तर पोटात घालायच्या पालेभाज्या उघड्या रस्त्यावर विकल्या जातात,
* जिथं प्रत्येकाला प्रसिध्दी हवी आहे, मात्र त्यासाठी कुणी सत्-मार्ग अवलंबण्यास तयार नाही,
* जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं,
* जिथं चहाच्या टपरीवर लोक "बालमजुरी" वरच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा करतात - म्हणतात "यार, बाल-मजुरी करवणार्‍यांना फासावर लटकवलं पाहिजे" .... आणि नंतर आवाज देतात...."छोटु.... दोन चहा घेऊन ये...!"


..... तरीसुध्दा ...... माझे माझ्या देशावर प्रेम आहे!

भास...

घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
“प्रेम करतो तुझ्यावर, तू करशील माझ्यावर?”
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं.
ढग नाही बरसले तेंव्हा
वारा नाही सुटला तेंव्हा
मोरही नाही दिसला नाचताना
एक कावळा तेवढा ओरडला
त्याला मात्र सतारीच्या झंकाराचा भास झाला.

अविश्वासानं त्यानं थरथरत
तिचा हात हातात घेतला
छाती फाटेस्तोवर एक भला मोठा
मोकळा मोकळा श्वास घेतला
चंद्र नाही हसला तेंव्हा
मोगरा नाही फुलला तेंव्हा
गाणंही नाही सुचलं गुण्गुणावं म्हणताना
एक स्कूटरवाला तेवढा शीवी हासडून गेला
त्याला मात्र सनईच्या ओल्या सुरांचा भास झाला.

मग पुढं लग्न-बिग्न, पोरं-बिरं
संसार-बिंव्सार करून झालं
चिमणा चिमणीचं एकच पाखरू
दूर विदेशात उडून गेलं
एके दिवशी घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
“जमलं का गं मला, तुला सगळी सुखं द्यायला?”
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं.

समाधानानं थरथरता त्याचा हात
त्यानं तिच्या हातात ठेवला
छाती फाटेस्तोवर एक भला मोठा
मोकळा मोकळा श्वास घेतला
पाऊस नाही पडला तेंव्हा
क्षीतीज नाही रंगलं तेंव्हा
झुलाही नव्हता तिथं झुलावं म्हणताना,
पोस्ट्मन तेवढं पोराचं पत्र टाकून गेला
त्याला मात्र आयुश्यच सतार झाल्याचा भास झाला

तू परतुन येवू नकोस..

तू परतून येवू नकोस
तू नकळतपणे आलीस माझ्या
हृदयाच्या प्रांगणात चोरपावलानं
अन् समोरुन नाही तर एका
बेसावध क्षणी,तेही मागच्या दारानं

अजाणत्या वयात नाही कळालं
घ्यावा कुणाचा कौल?
बुद्धी नेहमीच सांगत आली
विचार कर खोल
पण हृदय घसरलं की
न कळे गेला मनाचा तोल
नंतर लक्षात आलं की तुला
नसे या कशाचंच मोल

अजुनही स्मरतोय मला
तुझा तो अलवार स्पर्श
अन् त्या मागोमागचं
निष्पाप, निरागस हास्य
कसं विसरू मी तुझं ते
मधुर निर्झर भाष्य
अन् नकळतपणे बाहेर
पडलेलं लाडीक “इश्श्य”

खरं सांगू??, तुझं हे प्रत्येक असणं
मी जपलंय वहीतल्या मोरपिसांसारखं
अगदी तुझं झिडकारणंही झेललंय मी
गुलाबाच्या काट्यासारखं
ते आठवण करुनं देतात मला
जखम अजूनही रक्तरंजीत असल्याचं

जरी तूला जाणवलं असेल
आताश्या, मला संवेदना असल्याचं
तू परतून येवू नकोस सोंग घेऊन
जसं काही झालंच नसल्याचं
खरंच, मला नाही झेपायचं दुःख
आणखी, हेही स्वप्न भंगल्याचं