उचलूनी देह ताठ नयनांतून आग ज्यांनी ओकली
क्रौर्यतेच्या राक्षसांची मान पराक्रमाने छाटली
फळ आज उपभोगतो ज्यांच्या शर्थ प्रयत्नांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.
स्वप्नभरारी ज्यांनी वास्तवात आहे घेतली
क्षणोक्षणी मोहमाया देशासाठी लाथाडली
सुख इतरांना देण्या दुःख जे स्वतः विसरले
माणूसकी जपण्यास ज्यांनी आयुष्य सारे वेचले
व्हावे नतमस्तक फक्त नाव घेता ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.
कोण मी, जन्मलो का हे स्वतःस ज्यांनी विचारले
नुसतेच नाही पूर्वजांच्या पुतळ्यांस सलाम ठोकले
विचार ज्यांचे अस्त्र अन व्यक्त होण्या धमक आहे
यौवनाचा रंग ज्यांच्या रक्त जैसा लाल आहे
जाणूनी पुरुषार्थ जाणीवेने पेटले ऊर ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.
निरक्षरता भ्रष्ट आचार अन जातीपातीची घाण
जाणूनी मूल्ये ज्यांनी फडकवले बंडाचे निशाण
शिकवण्या दुसऱ्यास आधी ज्यांनी स्वतः नियम पाळले
वादळाचे घर ज्यांनी स्वतःत आहे बांधले
मुक्त होण्याचे स्वप्न पाहण्या नयन आहेत समर्थ ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे….!
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment