काळजातुन धबधबा घोंघावतो दिनरात आहे

झिंगलेल्या यात्रिकाला वादळाची साथ आहे
शोधला नाही कधी कोठे नदीचा काठ आहे

शीड फ़ुगलेले असे भरदार छाती फ़त्तरी
दोरखंडासारखा पिळदार तोही ताठ आहे

येऊ दे ज्वालामुखी लाव्हा किती अंगावरी
मार्ग त्याने आखलेलाही ‘तसा’ भन्नाट आहे

आडवा येईल जो होईल पुरता आडवा
हीच त्याच्या पौरुषाने बांधली खुणगाठ आहे

मागतो तुमच्याकडॆ त्याची विनंती खास ही
पिंगळावेळेस सांगा ‘माझीही तुज साथ आहे’

झेप घे गरुडा तुझा तू वाढ्वी रे हौसला
जो कुणी ना जिंकला चढणार तू तो घाट आहे

नाम गुम जाये तो जाये काय पर्वा काळजी
काळजातुन धबधबा घोंघावतो दिनरात आहे

0 comments: