तूच सांग, मी काय कारण देऊ??

सांगून गेलास निघुन दूर देशी तू,
येईन मी परत नको तू खंतावू
झाली कित्येक वर्ष त्याला,
थकले मी,किती रे वाट पाहू?
जग मला विचारतंय नाना प्रश्न
मी काय उत्तर देऊ?

जेवताना रोजच लागतो ठसका,
साऱ्या आप्तेष्टांची नावं घेऊन संपली,
रोज नवीन नाव कुणाचं घेऊ?
आठव तुझा रोज, दाटून कंठ येतो,
मग नाहीच येत अश्रू आवरता मज
कितीदा डोळ्यात कुसळ नाही तर
कांदा लागल्याचं कारण देऊ?

असते आजकाल दर आठवड्याला वधू परिक्षा
मिसळंत आसवाचं खारट पाणी चहा देताना
बिघडते चव,करतात सगळेच मग त्रागा
“आमची होशील का?” प्रश्न भर-सभेत होता
सर्वस्व वाहिलेलं तूला मी काय उत्तर देऊ?

विरह असह्य होतो, प्राण कंठाशी येतो,
निघते सरळ मग कडेलोटाला, फ़िरते
माघारी वचन तुला दिलेलं आठवताना
“काय कुठून आलीस?” होता प्रश्न मला
कारण “निसर्ग पहायला गेले होते” असं देऊ ?

ज्ञानेशाची विरहिणी मी, नाही येत
माझी व्यथा चार ओवींमधे सामावता
लिहिते रोजनिशी गर्भित शब्द येतात मदतीला
विचारलंच स्पष्टिकरण तर कुणाला काय देऊ ?

उरली-सूरली आशाही संपली, जेव्हा तुझ्या करता
तेवत ठेवलेली पणती परवाच्या वादळात विझली
मृत्यूला कवटाळताना शेवटी तुझं की इश्वराचं नाव घेऊ?
भेटशील ना रे तिथे तरी की आसमंती भटकत राहू?

0 comments: