खोवशील ना मला माझ्याही नकळत
तुझ्या वेणीतलं मोगर्याचं फ़ुल व्हायचंय मला
भिजशील ना माझ्या अंगणात मनसोक्त
तुला आवडणारी सुखद श्रावणसर व्हायचंय मला
झेलशील ना मला हळूवार अलगद
तुझ्या अळवावरचा टपोरा थेंब व्हायचंय मला
देशील ना मला प्रेमानं आलिंगन
तुझ्या कुशीतली कापसाची ऊशी व्हायचंय मला
सावरशील ना मला नेहमी भरकटताना
तुझ्या साडीचा ढळणारा पदर व्हायचंय मला
शोधशील ना मला नितळ सागरकिनारी
तुला सापडणार्या शिंपल्यातला मोती व्हायचंय मला
पुसशील ना मला तुझ्या रुमालाने
तुझ्या गालावरुन ओघळणारा अश्रू व्हायचंय मला
घालशील ना हळुवार प्रेमाची फ़ुंकर
तुझ्या नाजूक तळहातावरला फ़ोड व्हायचंय मला
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment