समाजव्यवस्थेचा कणा : आई

खरे म्हणजे आईविषयी इतके लिहीले गेले आहे, कथा, कादंबऱ्या आणि बॉलीवूडने आईला अजरामर केले आहे, त्यामुळे मी आता वे
गळे काय सांगणार असा प्रश्न वाचकाला पडणे साहजिक आहे.

मी वयाची पन्नाशी पार केल्यावर आणि माझ्या आईने ऐशी वर्षे ओलांडल्यावर तसेच अनेक मित्र आणि आजूबाजूच्या अनेक आयांना बघितल्यावर जाणवणारी बाब म्हणजे भारतीय समाजव्यवस्था टिकून आहे ती आई या बळकट वटवृक्षामुळे.

मुळात आईपण ही बाबच खडतर आहे. मुल कितीही मोठे झाले तरी त्याला आईची गरज भासते. किंबहुना माणूस वयाने वाढला की त्याला आईचे महात्म्य अधिक दिसू लागते. तरुणपणाची मस्ती उतरली की आधार आईचाच असतो हे त्याला जाणवू लागते. एका टप्प्यावर मित्र, मैत्रिणींचे स्थान आईपेक्षा वरचे ठरते. त्यांचा सल्ला घेतला जातो. नोकरी वगैरे लागली की आलेल्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे आईचा सल्ला न घेण्याकडे कल असतो. मग तिने आपल्याला अनेकदा कठीण परिस्थितीतून सावरलेले असते, आपल्याला सांभाळुन घेतलेले असते, अनेक गुन्हे वडीलांपर्यंत न पोहोचवताही आपल्याला कानपिचक्या दिलेल्या असतात, वेळप्रसंगी आपण दोन घास कमी खाऊन आपल्याला काही कमी पडू दिलेले नसते या साऱ्या बाबींचा विसर पडतो.

नंतर लक्षात येते की आईने वेळोवेळी दिलेले सल्ला, सावधानतेचे इशारे, मांडलेली मते ही अधिक दिशादर्शक होती. त्यात आईकडे अनुभवातुन आलेले शहाणपण तर होतेच, पण मायेचा अखंड स्त्रोतही होता. संसार कसा करावा. कोणाला टाळावे आणि कोणाला महत्त्व द्यावे, पैसा कसा वाचवावा अशा अनेक बाबींमध्ये तिचा दृष्टिकोन बराच पुढचा विचार करणारा होता.

आई ही संस्था कुटुंब टिकवण्यात मोलाचा वाटा उचलते. आता आया नोकरी करायला लागल्या, त्या स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. परंतु, अगदी काही वर्षांपूर्वींपर्यंत आईने घर सांभाळायचे, आल्यागेल्यांचे करायचे, मुलांची काळजी घ्यायची, सणउत्सव साजरे करायचे आणि मुख्य म्हणजे हे सारे घरातल्या र्कत्या पुरूषाने दिलेल्या मर्यादित रकमेत पार पाडायचे. हे करताना अडीअडचणीसाठी बचत करायची, मुलांच्या भविष्याची तरतूद करायची. हे करत अनेक आयांनी आपल्या मुलांना मोठे केले. त्यांचे कर्तृत्व फुलवले. त्या काळात गरिब असणाऱ्यांची संख्या बरीच मोठी होती. त्यामुळे परिस्थितीशी झगडत प्रपंच करणाऱ्या आयाही बऱ्याच होत्या. आता तुलनेने मध्यम वर्ग वाढला आहे परंतु यामुळे आईची जबाबदारी बदलली आहे असे नव्हे. आजही नोकरी करणाऱ्या आईला घर सांभाळावेच लागते. मुलांचा अभ्यास, त्यांचे खाणेपिणे याचा विचार करावा लागतो. नातीगोती सांभाळावी लागतात. आजची आई त्यामुळे लोकलमध्ये भाजी निवडताना दिसते आणि पहाटे उठून डब्यांची तयारी करताना दिसते.

यात आश्चर्याची आणि कौतुकाची बाब अशी की आईची भूमिका पार पाडताना ती आपण काहीच विशेष करत नाही अशा आविर्भावात वावरत असते. अनेकदा यात ती स्वत:च्या आवडीनिवडींकडे, प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असते. पूर्वीच्या जमान्यात हे अधिक प्रमाणात घडत होते, कारण स्वत:चा विचार करायला तिला सवडच नसायची आणि पैसेही.

आईच्या भूमिकेत असतानाही ती, पत्नी, सुन, भावजय, नणंद अशा अनेक भूमिका सहजतेने पार पाडत असते. हल्ली कुटुंबाचा आकार कमी झाला आहे, माणसे सहजतेने एकमेकाकडे जातयेत नाही. पूर्वी बॅग घेऊन नातेवाईक कधीही यायचा. तो नोकरीसाठी नाहीतर शिक्षणासाठी आलेला असायचा. त्याचा मुक्काम किती दिवस आहे हे माहीत नसायचे. तो नातेवाईकही दूरचा असायचा. पण पाहुणचार करताना आईच्या चेहऱ्यावरचे स्वागताचे भाव कमी होत नसत. आज अर्थातच हे कमी झाले आहे. पण अशी परिस्थिती आली तर तिच्यात आईची माया जागी होईल यात शंका नाही.

सर्वांना जोडणारा दूवा असेच आईचे रूप राहीले आहे. तिच्यामुळे चार भिंती न राहता घर बनले आहे, घरपण राखले गेले आहे. आई म्हटल्यावर हे सारे आठवते. मग ती आई कोणाचीही असो. अशा आईला खरे म्हणजे वर्षाचे ३६५ दिवसही वंदन करायला हवे. निदान मातृदिनी तरी आपल्या आयुष्याला वळण लावणारी म्हणून तिचे पूजन करायला हवे.

0 comments: