आठवणींचं पिंपळपान…

गाव माझा जुना माझी वाट पाहात आहे
दुरवरच्या शहराचा तो थाट पहात आहे ।

दुरदुर हिरवी पहाटे डोलणारी धरती
झुंजूमुंजू झाले की देवळामधली आरती ।

देवाची ती पुजा तो दरवळणारा धुप
अजुन जाणवतेय मला लाल दुलाईची उब ।

नदी काठचं घर,समोर टाकलेले सडे
उगाच आठवताय मला नदित फेकलेले खडे ।

घरामागचे अंगण,अंगणातले खेळ दिसताय अजुन
माझ्या सवे खेळणारी ताई चाललीय पहा सजुन ।

वेशीवरचं झाड,त्या झाडाची ती सावली
त्या झाडाखालचे देऊळ , ती लोभस गुरुमाउली ।

अजुन बोलावतोय मला ,सुरपारंब्याचा तो खेळ
अजुन भुलवतोय मला ,फुलभुंग्याचा तो मेळ ।

शाळेसाठीची दिसतेय अजुन कच्ची पाउलवाट
वाटेवरली चिंच,शेजारुन वाहणारा तो पाट ।

शाळेची पडकी अजुन तशीच उभी आहे
खिडकीतुन दिसणारया टेकडीची अजुन सुन्दर खुबी आहे ।

पावसाच्या त्या सरी,ती दबक्या मधली पोरं
सरी ओसरुन झाल्यावर धुउन निघालेल वार ।

पानावरुन ओघळनारया टपोरया थेंबाचे ते मॊती
ते वाहणारे पाणी,ती दरवळलेली माती ।

साठलेल्या पाण्यामधे गोल थेंबाची ती चाल
पत्र्यावरचा आवाज तो मधुर सुरताल ।

थंड पाण्याचा तो झरा मला सुचलेल्या ओळी
शेजारी मोकळे ते रान , त्यात शांत गाय भोळी ।

गावापासुन दुर नुसत , गर्दीच ते रान
गावमध्ये जपुन ठेवलय मी……
…………………………आठवणींच पिंपळपान ।

0 comments: