क्षण...

क्षण...
कधी हसरे, बोलके
कधी अजाण, दु:खी
कधी अवखळ, निर्मळ
तर कधी धीरगंभीर शांत

क्षण...
कधी रुसलेले
कधी फसलेले
काही गमावलेले
काही निसटलेले

क्षण...
आनंदाने नाचणारे,
स्वत:शीच गुणगुणणारे
हातात हात धरून
फेर धरायला लावणारे

क्षण...
कशी स्वत:ला हरवून टाकणारे
आजूबाजूच्या जगाला विसरायला लावणारे
हटके अश्या जगात नेणारे
त्या जगातूनच आपलं व्यक्तिमत्त्व घडवणारे

क्षण...
आईच्या मायेत भिजलेले
भावंडांच्या भांडणांत गुंतलेले
मित्रांसोबत धम्माल-मस्ती करण्याचे
प्रियकराच्या प्रेमात चिंब न्हाऊन निघण्याचे

क्षण...
बालपणीच्या निरागसतेचे
शाळेतल्या खोडकरपणाचे
कॉलेजकट्ट्यावरच्या गप्पांचे
तारुण्यातल्या चैतन्याचे

क्षण...
काही आयुष्याला नवीन वळण देणारे
तर काही आयुष्याची वाट लावणारे
कधीही न हरवण्यासारखे
कधीही न विसरण्यासारखे

क्षण...
आठवणींच्या कुपीत जपून ठेवावे असे
पुन्हा पुन्हा जगावेसे वाटणारे
कुणाच्या तरी आठवणीने रात्र रात्र जागवणारे
मनात गडद काळोख दाटवणारे

क्षण...
अनेक...असंख्य...अमर्याद...अजरामर
आपल्याला आयुष्यातून उठवणारेसुद्धा
फक्त न फक्त क्षणच...

0 comments: