परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करू दे त्याला
तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडिसच्या जमान्यात उंदरावरून फिरतोस
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक
इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खूष करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सारं मॅनेज होत नाही
पूर्वीसारखी थोडक्यात माणसं खूषही होत नाहीत
इमिग्रेशनच्या रिक्वेस्ट्सने सिस्टिम झालीय हँग
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग
चारआठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फाइल्स नुसत्या वाढतच जातात
माझं ऐक तू, कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थिअरीमधे मिळेल सोल्यूशन
एमबीएचे फंडे तू शिकला नाहीस का रे?
डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी ऐकलं नाहीस का रे?
असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या सार्या दूतांना कनेक्टिव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होईल धावपळ नको
परत येऊन मला दमलो म्हणायला नको
माझ्या सार्या युक्त्यांनी बाप्पा झाला खूष
माग म्हणाला हवं ते, एक वर देतो बक्षीस
सीईओची पोझिशन, टाऊनहाऊसची ओनरशिप
इमिग्रेशनदेखील होईल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप
मी हसलो उगाच, म्हंटलं, देशील ते मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं?
‘पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं'
‘सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं’
‘हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव’
‘प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्यात थोडासा शिरकाव’
‘देशील आणून परत माझी हरवलेली नाती’
‘नेशील मला परत जिथे आहे माझी माती’
‘इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं’
‘आईबापाचं कधीही न फिटणारं देणं’
‘कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर’
‘भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार’
‘यंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान’
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान?
“तथास्तु” म्हणाला नाही, सोंडेमागून नुसता हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, “सुखी रहा” म्हणाला
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment