माझ्या मागे....!

मी सुखे त्यागुनी सारे;
असे हरवतो जेंव्हा;
न जाणे कसा उमटलो
हा रस्ता माझ्या मागे...॥१॥

दर्पणात या इसमां
पाहणे अशक्य आहे;
तू काय हवी ती कर तयाची
अवस्था माझ्या मागे... ॥२॥

मी धावत होतो अथवा;
फरफटलो गेलो तरीही
हे काय नित्य स्तब्ध उभे
जन्मतः माझ्या मागे....॥३॥

काळाचा वेग असाध्य;
मन चक्काचूर होते
समोर पळते काही
सर्वत: माझ्या मागे....॥४॥

मज देह रिताच होता;
मोक्षाधीन आता झाला
ही कशास करिता तुम्ही
सांगता माझ्यामागे....॥५॥

असणे नसणे सारे;
जर हाती तुझ्याच आहे
का राहतोस व्यर्थ उभा
समर्था माझ्या मागे....॥६॥

मैत्री असते कशी ...


मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?

हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की.

मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?

हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जा‌ईल तशी.

मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?

हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.

मैत्री असते कशी, फोडणीसारखी?

हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.

मैत्री असते कशी, मीठासारखी?

हो हो मीठासारखी. नसेल तर हो‌ईल जीवन अळणी.

चिमणं गोष्टी

चिमणे चिमणे रडू नको!
आईचा पदर ओढू नको!
सोपवते तुज बाईंच्या हाती,
शाळेला कधी टाळू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी,
पंख पसरून उडण्या साठी..
भरारी घेताना भिऊ नको!
उंच उंच जाण सोडू नको!!!

चिमणे चिमणे रडू नको!
सुटले घरटे समजू नको!
संसारी केली तुझी पाठवणी,
कमी स्वत:स लेखू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी!
टिपशील दाणे बाळा साठी!
शेवटची गं ही बाळे पाठवणी,
आता चिमणू राहू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी,
चिमणं गोष्टी विसरू नको!
चिमणे चिमणे रडू नको,
चिव-चिव करण सोडू नको!!!