राजे पुन्हा जन्मास या..

जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या

शिरि शिरपेच हाती समशेर शोभती
अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती
हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती
भगवा धरुन हातात या..राजे पुन्हा जन्मास या. || १ ||

कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास
फाडिले अफजल खानास तसा
आज सरकार म्हणे त्यास फासी नको.
फाडण्या पुन्हा खानास या
राजे पुन्हा जन्मास या. || २ ||

नाव घेती तुमचे किती, परी
चरित्र कुणा का ना उलगडे तरी?
राजकारण करी, ती नावावरी,
शिकवण्या धडे राजकारणाचे या
राजे पुन्हा जन्मास या. || ३ ||

पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या
मराठि अस्मिता जागविण्यास या
नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता
माणुस मराठि एकदा जोडण्यास या
राजे पुन्हा जन्मास या. || ४ ||

जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो
स्विकारण्या माझ्या मुजर्यास या
राजे पुन्हा जन्मास या.
जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या. || ५ ||

----- --- स्वप्निल देमापुरे

चुकलंच.... पण कुणाचं ??

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं...

हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?
आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??

पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??

तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,
मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?

मी काहीच बोललो नाही.
बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!

शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..

मी तिला असं दुःखवायला नको होतं...
मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!
की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...

स्वराज्य तोरण चढे...

स्वराज्य तोरण चढे...

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला , भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा , आज दिवाळी
चला , सयांनो , अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे , सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी , जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!

* कवयित्री - शांता शेळके * संगीतकार - आनंदघन
* मूळ गायक -लता , उषा , मीना , हृदयनाथ मंगेशकर , हेमंतकुमार

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात ...


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील....!

एक अनामिक