करीअर कथा ...


|| करीअर कथा ||
बारावीचा निकाल | मग सीईटीचा परीक्षाकाळ |
परीक्षांचा झाला सूकाळ | आता ठाई ठाई ||१||

इंजिनीअरिंग का मेडिकल | जाणावा आपुला कल |
पडताळावे इतर सकल | विषय आणि पर्याय ||२||

शिक्षणाचे मार्ग सगळे | पर्याय अनेक वेगळे
जे आपणा न कळे | तज्ञांना विचारावे ||३||

बारावी नंतर काय | प्रश्न करती वडील माय |
आहे यावर उपाय | फक्त मुलांची आवड ||४||

बाळाचे पाय पाळण्यात दिसती | उक्ती अनुभवी सांगती |
त्याची घ्यावी प्रचिती | मुलांच्या भल्यासाठी ||५||

आवडीचे क्षेत्र निवडावे |   तसेच मार्गदर्शन करावे |
मुलांचे भले पाहावे | प्रथम त्यांच्या आवडीत ||६||

आपली आवड कशात | जाणून त्या विषयांत |
मेहनत करावी त्यांत | मुलांनी प्रगतीसाठी ||७||

प्रसिध्द खेळाडू किती | यशस्वी ते उद्योगपती |
त्यांनी केली प्रगती | आवडीच्या विषयांत ||८||

जी आपली आवडी | त्यात घेतली आघाडी |
ते क्रिकेट खेळगडी | फक्त बारावी पास ||९||

गुण असती उपजत | त्यांनाच घालावे खत |
नाही येणार आफत | भविष्यात चिंतेची ||१०||

आवडीच्या विषयात | थोडीच पुरते मशागत |
विषय होईल अवगत | पटकन लवकर ||११||

गायक सुरात नाहले | नायक अभिनयात मुरले |
नर्तक तालात नाचले | आनंदात सुखेनैव ||१२||

चित्रकार चित्रात रंगले | शिल्पकार शिल्पात घडले |
कलाकार कलेत रमले | जातीचे कलावंत ||१३||

आवडीच्या विषयात करता कष्ट | आळस होतो नष्ट |
आलेख दिसतो स्पष्ट | उज्ज्वल भविष्याचा ||१४||

काही चालती धोपट मार्गे | काही धावती झटपट मार्गे |
नका जाऊ आडमार्गे | पैसा आणि प्रगतीसाठी ||१५||

जपावी नैतिकता | निवडा आवडीची उद्योजकता |
नेटाने कष्ट करता | प्रगती आहे निश्चित ||१६||

कोणी करती चर्मोद्योग | कोणी करती कुटीरोद्योग |
करावा असाच उद्योग | मराठी माणसाने ||१७||

निर्णय नसावा अयोग्य | विचार करावा सुयोग्य |
शिक्षण निवडा स्वयोग्य | आवडीच्या विषयात ||१८||

छंद विषयांत नाही ताप | कामाचा नाहीच संताप |
शक्य होते करणे प्रताप | दडपणाशिवाय ||१९||

काम होईल झटपट | उत्साहात छान पटापट |
वाटणार नाही कटकट | आवडीच्या विषयाने ||२०||

आवड असता नाही डोकेफोड | बोलता येईल फडाफड |
प्रश्नांची उत्तरे सडेतोड | देता येतील सदैव ||२१||

आयुष्य सरेल छान मस्त | मन राहील आनंदे चुस्त |
काम होता बिनधास्त | सूर सापडेल प्रगतीचा ||२२||

काम जमता निश्चित | भविष्य नसेल अनिश्चित |
जीवन प्रवाह विनाखंडित | पार पडेल सुरळीत ||२३||

क्षेत्र आवडीचे निवडावे | पदवीस प्राप्त करावे |
प्राविण्य पुढे मिळवावे | प्रयत्ने सातत्याने ||२४||

करिअरची होता घटट मुळे | जीवन वृक्ष फुले फळे |
जीवन अवघे उजळे | समस्त कुटुंबियांचे ||२५||

करिअर कथा वाचावी | तशीच लोकांस सांगावी |
कथेची प्रचिती घ्यावी | सर्व विद्यार्थ्यांनी ||२६||

स्वप्ने ही आपलीच असतात ....

स्वप्ने ही आपलीच असतात ,
हृदयात त्याना जपायची असतात ,
फुलांसारखी फुलावायाची असतात ,
घरांसारखी सजवयाची असतात ,
कारन स्वप्ने आपलीच तर असतात ,
रेशीम बंधाने त्याना बांधयाची असतात ,
मनातल्या मंदिरात पुजयाची असतात ,
कधी कधी अश्रुंच्या पुरात वाहून द्यायची असतात ,
आठवनींच्या जगत कोठेतरी सकारायाची असतात ,
पूर्ण झाली नाही तरी ....
शेवटी स्वप्ने ही आपलीच असतात ....
हृदयात त्याना जपायची असतात ........

जे मनाला पाहिजे ते..

जे मनाला पाहिजे ते मिळत नाही
जे नकोसे वाटते ते टळत नाही...

एवढा माझ्यामध्ये मी गुंग असतो;
सूर आताशा कुणाशी जुळत नाही...

चेहरा इतका निरागस, भाबडा पण
आतले काही कुणाला कळत नाही...

अश्रु प्याले, मद्य आणिक जहरसुद्धा
दुःख माझे त्यांतही विरघळत नाही...

चांदणेही लुप्त असते रात्रभर अन
रात्र वैऱ्याची अशी मग ढळत नाही...

वाट ही नुसतीच जाते दूर कोठे?
वळण येते तरिहि मागे वळत नाही...

स्वप्न, आशा, ध्येयही दिसते पुढे पण
आज मागे मी कशाच्या पळत नाही...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

- सुरेश भट

जेव्हां मिळेल एकांत...

कधी मिळाला एकांत
तर् बसावे....एकटेच्
काढीत जून्या आठवणी
काही क्षणांच्या....हलकेच्

ते क्षण रंगवावे,
सजवावे डोळ्यांच्या पापण्यांवर
जे,...
कधी दुस-यात रमलेले,
कधी आपल्यातच् हरवलेले,
कुणावर रागावलेले..

तर कधी....
आपल्यावर् कुणी हिरुमुसलेले
अन् त्याचा रुसवा काढण्यासाठी
आपणही खोटे-खोटेच् रुसलेले

ते क्षण लांबवावे...
डोळ्यांच्या कोंदणात त्यांना
मंद हासवावे....
अशा क्षणांच्या स्मॄतीत,
डोळे भरुन येतात्
त्यातील काही आसवे
गालावरती ओघळतात

अशावेळी....
त्यातल्या काही आसवांना
हातावर झेलावे, पहावे
फक्त पहातच रहावे
आणि....

एका वेगळ्या आशेसाठी
त्यांस चवीने चाखावे
ते फक्त....

गडद स्मॄतींना पचविण्यासाठी
आणि त्या पून्हा जाग्या करण्यासाठी
जेव्हां मिळेल एकांत...........


कुसुमाग्रज....